🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

पुरस्कारांची बाजारपेठ

 पुरस्कार एक अशी गोष्ट, जी कोणालाही मिळाली की आपण त्याच्याकडे आदराने पाहतो. आपल्याला वाटतं, ही व्यक्ती काहीतरी मोठं, महत्त्वाचं कार्य करत असणार. कारण पुरस्कार म्हणजे कर्तृत्वाची पावती, नव्हे का? पण आजच्या धावपळीच्या, सोशल मीडियावर चालणाऱ्या यशाच्या झगमगाटात हे चित्र झपाट्याने बदलत आहे. आज ‘यश’ ही संकल्पना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि फेसबुक-इंस्टाग्रामवरील सेल्फी, पोस्टपुरती सीमित झालेली दिसते. आज जिथे पाहावं तिथे पुरस्कारांची गर्दी आहे. साहित्य, शिक्षण, पत्रकारिता, समाजकार्य, चित्रपट, उद्योजकता, अगदी शासकीय सेवेतही. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज पुरस्कार देण्यामागे असलेली प्रक्रिया पारदर्शकतेपासून दूर, ‘सेटिंग-शिफारशी’च्या माध्यमातून चालते आहे. त्यामुळे आज पुरस्कार मिळवण्यासाठी कामापेक्षा ओळख, प्रामाणिकतेपेक्षा आर्थिक व्यवहार व विचारांपेक्षा चमचेगिरी अधिक महत्त्वाची बनली आहे.

मागील काही वर्षांतील पुरस्कारांच्या यादीकडे जरा बारकाईने पाहिलं, तर एक ठळक वास्तव समोर येतं ते म्हणजे "गल्लीपासून दिल्लीपर्यंत" पुरस्कार मिळणाऱ्यांची निवड ही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांपुरतीच मर्यादित राहिलेली आहे. साहित्य असो, शिक्षण असो, समाजकार्य, कला, पत्रकारिता किंवा शासकीय सेवांतील कामगिरी अनेक नामवंत पुरस्कार हे सत्ताधारी विचारधारेच्या जवळच्या, त्या विचारविश्वाशी संलग्न लोकांनाच मिळत असल्याचं प्रकर्षाने दिसून येतं. हे चित्र इतकं ठळक झालं आहे की आता "ज्यांची सत्ता, त्यांना सन्मान" हे एक अघोषित तत्त्व बनलं आहे. पुरस्कार हे एखाद्या कार्याची, कर्तृत्वाची पावती देणं सोडून, विशिष्ट राजकीय किंवा सांस्कृतिक निष्ठा जोपासणाऱ्यांसाठीचा ‘बक्षीसवाटपाचा कार्यक्रम’ झाल्यासारखं वाटतं.

सत्य, सामाजिक वास्तव, व्यवस्थेतील उणिवा मांडणारे, सत्तेला प्रश्न विचारणारे लेखक, पत्रकार, कार्यकर्ते हे पुरस्कारांच्या स्पर्धेत मागे राहतात. कारण त्यांचं काम सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे नसतं. त्यामुळे त्यांचं मोठेपण त्यांच्या सन्मानपत्रांमध्ये नव्हे, तर जनतेच्या मनात असतं. पण हे मन मान्य करणं ही सध्याच्या पुरस्कारसंस्कृतीची प्राथमिकताच राहिलेली नाही. पुरस्कार हे सत्तेच्या जवळ जाण्याचं माध्यम झाले आहेत आणि यामुळे पुरस्काराचं आत्मिक मूल्यच कमी झालं आहे. त्यामुळेच प्रामाणिक कार्य करणारे लोक वारंवार दुर्लक्षित राहतात.

साहित्य हे सृजनशील क्षेत्र आहे. कल्पकता, विचारशक्ती आणि अनुभवांची खोल समज असलेली माणसं यात लिहितात. त्यांच्या प्रत्येक शब्दामागे आयुष्यातून आलेला अनुभव असतो. पण हल्ली हेही क्षेत्र ‘पुरस्कार’ नावाच्या बाजारात अडकलेलं दिसतं. काही लोक वर्षभरात दहा-पंधरा पुरस्कार मिळवतात. त्यांचं लेखन फारसं कुणी वाचत नाही, पण तरीही त्यांच्या फोटोशिवाय कुठलाही साहित्यसंमेलनाचा बॅनर अपुरा वाटतो. कारण त्यांचं खरं काम लेखन नसून, अर्ज भरणं, शुल्क भरणं व जिथं जावं तिथं उपस्थित राहून परीक्षकांशी ओळख ठेवणं हे असतं. या मंडळींना माहीत असतं की पुरस्कार मिळवण्यासाठी काय करायचं. कुठल्या संस्थेचा अर्ज कधी भरायचा, कुठे किती रुपये द्यायचे, आणि कोणत्या कार्यक्रमात स्टेजवर चढायचं. त्यामुळे त्यांच्या लेखनात किती दम आहे हे महत्त्वाचं राहत नाही, त्यांच्या ओळखी किती आहेत हे महत्त्वाचं ठरतं.

या पुरस्काराच्या साखळीत आज "तुझ्या संस्थेचा पुरस्कार मला दे, उद्या माझ्या संस्थेकडून तुझा गौरव करतो" हा अलिखित नियम आजकाल अनेक पुरस्कारप्राप्त मंडळी अगदी श्रद्धेने पाळतात. यात लेखनाचा दर्जा महत्त्वाचा राहत नाही, वाचकांचा प्रतिसादही कुणाला फारसा हवा नसतो. महत्त्वाचं असतं ते केवळ ओळखी, जनसंपर्क, आणि ‘मी तुला, तू मला’ या देऊघेऊच्या समीकरणात टिकून राहणं. खरं म्हणजे लेखन हे अंतःकरणातून यायला हवं. पण आज उलटं चाललंय, लेखन होतं दाखवण्यासाठी व पुरस्कार मिळतात सेटिंगमधून. त्यामुळेच जे खरंच लिहितात, जे खऱ्या अर्थाने विचार मांडतात, ते मागे राहतात. कारण ते अर्ज भरत नाहीत, चमचेगिरी करत नाहीत व पुरस्कार मागत नाहीत.

शिक्षणाचं क्षेत्र हे खरंतर माणूस घडवण्याचं काम करतं. विद्यार्थ्यांमध्ये विचार करायची सवय, समाजासाठी काहीतरी चांगलं करायची भावना व योग्य ते मूल्य रुजवणं हे शिक्षणाचं कार्य. म्हणूनच इथे मिळणारा सन्मान म्हणजे केवळ एक सन्मानचिन्ह राहत नाही तर एक जबाबदारी बनते. पण हल्ली अनेक महाविद्यालयं आणि विद्यापीठं या सन्मानांनाही बाजारातल्या वस्तूप्रमाणे वापरत आहेत. कोण प्रसिद्ध आहे, कोणाकडून पैसे येतील याच्या आधारावर अनेकांना पुरस्कार वाटले जातात. आज मानद डॉक्टरेट ही सन्मानाची गोष्ट राहिलेलीच नाही. कारण अनेक विद्यापीठं अशा लोकांना डॉक्टरेट बहाल करतात ज्यांचा शिक्षणाशी, संशोधनाशी किंवा समाजकार्याशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. पण काय असतं ना, ते लोक प्रसिद्ध असतात, राजकीय ओळखीचे असतात व गरज पडल्यास संस्था चालवण्यासाठी आर्थिक मदतही करतात. त्यामुळे अशा लोकांच्या गळ्यात मानद डॉक्टरेटची माळ घालून त्यांचा गौरव केला जातो. कारण विद्यापीठांनाही हे माहीत असतं, आपल्या संस्थेला फंडिंग हवंय, नाव हवंय, आणि थोडं राजकीय पाठबळ हवं. मागे आमच्या परिसरातील एका विद्यापीठानं एका राजकीय नेत्याला डॉक्टरेट बहाल केली होती. त्यामुळे बराच विरोध झाला होता.

शिक्षकांना मिळणारे पुरस्कारही त्याच मार्गानं घसरले आहेत. अनेक शिक्षक स्वतःच अर्ज भरतात, स्वतःच स्वतःच्या लेखांचं संकलन करतात आणि वर आमदार-खासदारांकडून शिफारस मागतात. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी कोणत्या संस्थेला किती वेळा फोन करायचा यापर्यंत सगळं ठरलेलं असतं. पुरस्कार मिळवण्यासाठी काही शिक्षक तर थेट जनसंपर्क टीमच ठेवतात, म्हणजे शिक्षक कमी आणि सेलिब्रिटी अधिक. हे सगळं इतकं ठरवून केलेलं असतं की यात ज्ञानाचं, विद्यार्थ्यांचं काहीही राहात नाही. आणि जेव्हा पुरस्कार मिळतो, तेव्हा लगेच सोशल मीडियावर फोटो झळकतो "राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक" असा ठळक उल्लेख. पण त्याच शिक्षकाच्या वर्गातले विद्यार्थी अजूनही साधं इंग्रजी वाचू शकत नाहीत हे कोण विचारणार?

समाजकार्य म्हणजे लोकांसाठी स्वतःला झिजवणं, त्यांच्या दुःखात सहभागी होणं, रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध लढणं, गरजूंमध्ये राहून त्यांच्या अडचणींचं उत्तर शोधणं. हे क्षेत्र कधीच सोप्पं नव्हतं. पूर्वी समाजकार्य हे निस्वार्थ भावनेतून केलं जायचं, कुठलाही मोबदला, प्रसिद्धी किंवा पुरस्कार न बघता. पण आता समाजकार्य ही एक सेवा न राहता, एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी झाली आहे. अनेक संस्था आणि एनजीओ केवळ गौरव समारंभ चालवण्यासाठी कार्यरत आहेत. तुम्ही ५ हजार रुपये भरा, अर्ज भरून द्या आणि समाजरत्न, समाजगौरव, महान समाजसेवक अशा कुठल्याही उपाधीचा सन्मानपत्र तयारच आहे. सोबत फोटो, हारतुरे, स्टेजवर माइक व फोटोसाठी आकर्षक बॅनरही मिळेल. हे ऐकलं की खरंच वाटतं, सन्मान मिळवण्यासाठी आता काम नको तर पैसे लागतात.

समाजासाठी काय केलंय हे विचारलं जात नाही, पण स्पॉन्सर किती दिला हे विचारलं जातं. कारण बऱ्याच ठिकाणी गौरव म्हणजे गौरव नव्हेच तो एक व्यवहार आहे. ज्याला जे हवंय, ते विकत मिळतं. तुम्हाला प्रतिष्ठा हवी, त्यांना पैसे हवेत आणि डील फाइनल. अशा सन्मानित मंडळींकडे बघितलं की प्रश्न पडतो, खरंच का, या व्यक्तीमुळे कोणाच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडला? एखाद्या गोरगरीब माणसाच्या चेहऱ्यावर हास्य आलं? एखाद्या समाजातील समस्येवर कोणती कृती केली गेली? बहुतेक वेळा उत्तर ‘नाही’ असंच मिळतं. कारण अशी माणसं मैदानात नसतातच. ती केवळ स्टेजवर असतात. त्यांच्या हातात सन्मानचिन्ह असतं, पण त्यांच्या पायाखालची माती मात्र समाजाच्या खऱ्या प्रश्नांपासून लांब असते. कारण त्यांचं समाजकार्य हे कागदावर छापून येण्यासाठी असतं, प्रत्यक्षात लोकांमध्ये उतरून काम करण्यासाठी नव्हे. पण दुःखाची गोष्ट ही की, जे खरोखर समाजात काम करत राहतात, जे संकटाच्या वेळी लोकांसोबत उभे राहतात, जे अन्यायाविरोधात आवाज उठवतात त्यांना कोणतंही व्यासपीठ मिळत नाही, कोणताही पुरस्कार त्यांच्या नावावर राहत नाही. कारण या बाजारूपणाच्या काळात, झिजणाऱ्यांना पुरस्कार मिळत नाहीत. झळकणाऱ्यांनाच मिळतात.

राजकारणातले पुरस्कार ही तर एक वेगळीच कहाणी आहे. इथे पुरस्कार म्हणजे कर्तृत्वाची पावती नाही तर निष्ठेचं बक्षीस किंवा प्रचाराचं साधन असतं. एखाद्या खासदाराच्या किंवा आमदाराच्या नावे गौरव पुरस्कार सुरू केला जातो आणि तोच पुरस्कार दिला जातो त्यांच्या कार्यकर्त्यांना. काही ठिकाणी तर राजकीय पुढारी स्वतःच स्वतःचा गौरव करतात. कार्यक्रमात मोठ्या स्टेजवर बसायचं, स्वतःचं नाव मोठ्या अक्षरात लिहायचं, मग एखाद्या संस्थेच्या माध्यमातून खासदार श्री. फलाना यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गौरव! खरं तर हा गौरव म्हणजे प्रसिद्धीचा नवा फंडाच असतो. कारण तो ना लोकांनी निवडलेला असतो, ना जनतेच्या भावना ओळखून दिलेला. तर हा गौरव पूर्णपणे ठरवलेला, रंगवलेला व प्रचारासाठी वापरण्यासाठी असतो. 

उद्योजकता संघर्षातून उभं राहिलेलं क्षेत्र. कष्ट, कल्पकता, आर्थिक समज व नियोजित धोरणं या सगळ्याच्या मिश्रणातून उभा राहतो खरा उद्योजक. पण हल्ली या क्षेत्रात यशापेक्षा झगमगाट अधिक महत्त्वाचा ठरत चालला आहे. आज अनेक उद्योजक ब्रँडिंगसाठी पुरस्कार वापरत आहेत. ‘इतके लाख रुपये घ्या पण पुरस्कार मलाच द्या’ अशी मानसिकता वाढलेली आहेत. त्यामुळेच पैसे घेऊन पुरस्कार विकतं घेणं सोप्प झालं आहे. आज उद्योजकतेतही एक नवीन ट्रेंड सुरु झालाय. कर्तृत्व असो वा नसो, पण मार्केटिंग भारी असलं की पुरस्कार हमखास मिळतो. यात अनेकदा त्या कार्यक्रमांच्या आयोजक संस्थाही स्वतः उद्योजक असतात, ते स्वतःच एकमेकांचे पुरस्कार ठरवतात. 

आजचा काळ असा आहे की, माणूस काय करतो, हे कुणाला बघायचंच नाही. कोण किती झिजतो, कोण प्रश्नांशी भिडतो या गोष्टी फक्त जुन्या गोष्टी झाल्या. आता सगळं ठरतं ते सोशल मीडियाच्या प्रोफाईलवर. चार भारी पोझमध्ये फोटो, पाच-सहा रील्स आणि फॉलोअर्सचा आकडा फुगलेला असेल तर झालं. मग तुम्ही डिजिटल आयकॉन, युवा प्रेरणा, समाजसेवक आणि अजून काय काय? पुरस्कार देणाऱ्या संस्थांनाही आता काम करणाऱ्या माणसांची गरजच उरलेली नाही. त्यांना हवे असतात अशे लोक, जे त्यांच्या सोबत फोटो काढतील, स्टोरी टाकतील, आणि त्यांच्या संस्थेचं नाव तीस सेकंद दाखवतील.

या सगळ्या क्षेत्रांतील वास्तव पाहिलं की एक प्रश्न ठामपणे समोर येतो, खरंच योग्य माणसं योग्य जागी पोचतायत का? ज्यांचं कर्तृत्व आहे, ज्यांची मेहनत अफाट आहे आणि जे खऱ्या अर्थानं समाजासाठी झिजतायत त्यांचं नाव कुठंही उमटत नाही. कारण आज पुरस्कार मिळतात कर्तृत्वावर नाही, तर नेटवर्किंगवर. मेहनतीवर नाही, तर ओळखीवर मिळतात. खरं तर आज अनेकजण पुरस्कार मिळवून फुगतात. पण त्यांच्या नावापुढे लोकांनी उभं राहून टाळ्या वाजवाव्यात, एवढं मोठं आदराचं व्यक्तिमत्त्व ते कमावू शकत नाहीत. कारण त्यांनी पुरस्कार कमावलेले नसतात, ते मिळवलेले असतात.

वृत्तपत्रात नाव झळकणं, बॅनरवर चेहरा झळकणं, स्टेजवर सेल्फी घेणं आणि 'राष्ट्रीय गौरव'सारखं काहीतरी लिहिलं जाणं हे जर यशाचं अंतिम रूप असेल, तर आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनी काय करायचं? जे दिवसभर रस्त्यावर झिजतात, ज्यांच्या कामानं कुणाचं तरी आयुष्य बदलतं, त्यांच्यासाठी कोणता पुरस्कार? म्हणूनच आज गरज आहे ती या पुरस्कार संस्कृतीकडे नव्यानं आणि संशयाच्या नजरेनं पाहण्याची. कारण हातात सन्मानचिन्ह असणं म्हणजेच समाजात सन्मान मिळणं नसतं. तो सन्मान कमवावा लागतो आपल्या कृतीनं, आपल्या विचारांनी, आणि आपल्या माणुसकीच्या वागणुकीनं. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं

पुरस्कार हे मिळवले जाऊ शकतात पण पुरस्कार कमविण्यासाठी आयुष्य झिजवावं लागतं!"


(लेख सुरज पी दहागावकर  विचारज्योत फाउंडेशन चंद्रपूर)

थोडे नवीन जरा जुने