प्रतापगड - छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त माझ्या आयुष्यातील एक गोड, अविस्मरणीय आठवण सांगण्याचा हा सर्वोत्तम दिवस आहे…आम्ही काही मित्र-मैत्रिणी सातारा-महाबळेश्वर फिरायला गेलो होतो. पण काही पर्यटनस्थळे उघडायला वेळ असल्याने, दुसरीकडे जाण्याचा बेत आखला.जवळपास काय आहे हे माहीत नव्हतं.थोडी विचारपूस केली असता, एका टॅक्सी ड्रायव्हरने प्रतापगड अगदी जवळच असल्याचं सांगितलं…आणि मग काय, आम्ही मनोमन हरखून गेलो…कारण, मनात असलेली शिवरायांचे सगळे किल्ले पाहण्याची इच्छा प्रतापगडापासूनच पूर्ण व्हायला सुरुवात होणार होती. मग निघालो राजांच्या पाऊलखुणा शोधायला… महाराजांची गाणी ऐकत, "जय भवानी, जय शिवाजी"च्या गर्जना करत…प्रतापगडावर पोहोचताच, एक विलक्षण ऊर्जा मनात, शरीरात दाटून आली होती…आपण शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत उभे आहोत, या अनुभूतीने छाती अभिमानाने भरून आली. प्रतापगडावरून दिसणारे सह्याद्रीचे दृश्य डोळ्यांत किती साठवू आणि किती नको, असं झालं होतं.गडावर पोहोचल्यानंतर तिथे मिळणारी पिठलं-भाकरी… अहाहा! त्याची चव इतरत्र कुठेच नाही.त्या पिठलं-भाकरीचा आस्वाद घेत, मी सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्यात हरवून गेले होते…तेवढ्यात एक वयोवृद्ध गृहस्थ माझ्याजवळ आले.ओळख नसतानाही, अत्यंत आपुलकीने त्यांनी माझी विचारपूस केली.“कोठून आलीस? काय करतेस?” असे गोड प्रश्न विचारल्यानंतर, मी पत्रकार असल्याचं सांगितल्यावर, मला प्रश्न विचारण्याचा मोह आवरला नाही.त्यांनी सांगितल्यानुसार, ते आजोबा ८५-८७ वर्षांचे होते. आणि त्यांची पाचवी पिढी प्रतापगडावरच राहत असल्याचं कळलं.त्या आजोबांनी मला प्रतापगडावरून दिसणाऱ्या महाबळेश्वर पठाराची, तिकोना किल्ल्याची माहिती दिली…महाराज गडावरून ये-जा करायचे ती वाट, पालखी वाट, मुख्य दरवाजा… आणि मुख्य म्हणजे, जिथे महाराजांनी अफझलखानाचा वाघनखांनी कोथळा बाहेर काढला, ती ऐतिहासिक जागा, त्याच ठिकाणी बांधलेली अफझलखानाची कबर… या सर्व जागा दाखवत, त्यांचे ऐतिहासिक संदर्भ त्यांनी सांगितले.गडावरील शिवजयंतीचे उत्सव, तिथल्या परंपरा, स्थानिकांचा त्या गडाशी असलेला नातेसंबंध… अशा अनेक गोष्टी आजोबांनी मला भरभरून सांगितल्या.शिवरायांच्या शौर्यगाथा सांगताना, त्यांच्या वयोवृद्ध चेहऱ्यावर उमटलेला आनंद, त्यांच्या वळ्या पडलेल्या डोळ्यांत दिसणारा अभिमान, हे सारं बघून मी भारावून गेले.त्यांचे पूर्वज महाराजांच्या सेवेत होते, याचा त्यांना अतूट अभिमान होता.जेव्हा अफझलखानाच्या कबरीवरील अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत आला, तेव्हा गडावर व तिथे पिढ्यानुपिढ्या राहणाऱ्या लोकांवर आलेल्या अडचणी, प्रशासनाचे दुर्लक्ष, त्यांची उपेक्षा याबद्दल त्यांनी भरभरून सांगितले.किल्ल्यांवर येणारे पर्यटक शिवजयंती, राज्याभिषेक, अशा दिवशी मोठ्या संख्येने येतात.परंतु, त्यांच्या निघून गेल्यानंतर गडावर पडलेली कचरा-कुंड्या, प्लास्टिक, घाण साफ करण्याचं काम गडावरील स्थानिकांनाच करावं लागतं, हे सांगताना त्यांच्या आवाजात खंत होती…महाराजांनी स्वराज्यासाठी उभारलेले हे गड-किल्ले…त्यांची निगा राखणं, त्यांची पवित्रता जपणं, ही आपलीच जबाबदारी आहे, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं.
(माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही. फक्त तिथल्या लोकांनी व्यक्त केलेली मते मी इथे मांडत आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर क्षमस्व.) महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेरील किल्ले, राजवाडे… तिथले स्थानिक ज्या पद्धतीने ते जपून ठेवतात, त्याच पद्धतीने फक्त मराठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने एकत्र येऊन आपल्या गडकोटांचे संवर्धन करायला हवं.कारण, महाराजांचा जो इतिहास आपल्याला आज अनुभवायला मिळतोय, तोच इतिहास पुढच्या पिढीलाही अनुभवता आला पाहिजे.माझ्या वाचनानुसार, महाराजांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर मिळून सुमारे १११ किल्ले बांधल्याची नोंद एका बखरीत आहे.तर एकूण १६० किल्ले त्यांनी जिंकले, अशी नोंद आहे.परंतु, आज त्यातील काही मोजकेच किल्ले आपल्या डोळ्यांसमोर आहेत.आणि जर आत्ताच आपण या इतिहासाचं जतन केलं नाही, तर पुढच्या पिढीसाठी छत्रपती शिवराय फक्त गोष्टींत, पुस्तकांतच मर्यादित राहतील.त्यामुळे, हा इतिहास जपणं, त्याचं संवर्धन करणं, हे आपल्या सर्वांच्या हातात आहे, असं माझं ठाम मत आहे.आम्ही प्रतापगडावर आमच्या परीने एक छोटी स्वच्छता मोहीम राबवली.फोटो मुद्दाम टाकत नाहीये… कारण हे काम पब्लिसिटीसाठी नव्हतं, तर कर्तव्य म्हणून केलं होतं.आणि तेव्हा मी स्वतःशीच शपथ घेतली, की पुढे जेव्हा जेव्हा गडावर जाईन, तेव्हा महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी, त्यांच्या आठवणी टिकवण्यासाठी, शक्य तेवढं योगदान देईन.
शेवटी असंच वाटतं… माझं संपूर्ण आयुष्य जरी महाराजांना अर्पण केलं, तरी त्यांनी आपल्यासाठी केलेल्या उपकारांची परतफेड कधीच होऊ शकणार नाही…तुमच्याकडूनही हीच अपेक्षा…
शेवटी हेच म्हणेन…
आस्ते कदम… आस्ते कदम…
महाराssssssssज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधान जागृत
अष्टप्रधान वेष्टित
न्यायालंकार मंडित
शस्त्रास्त्रशास्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
प्रौढप्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज
राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो!
एक होतं गाव, महाराष्ट्र त्याचं नाव…स्वराज्य ज्यांनी घडवलं, छत्रपती शिवराय त्यांचं नाव…
राजांना त्रिवार मानाचा मुजरा… 🚩
जय भवानी जय शिवाजी 🚩
हर हर महादेव 🚩
(विशेष लेख जुही धर्मे मुंबई)