कोल्हापूर, दि.17 : कोल्हापूरकरांचा दीर्घकाळचा न्याय मिळवण्याचा लढा आज ऐतिहासिक क्षणात परिवर्तित झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गवई म्हणाले, “समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे. सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर लवकरच होईल, प्रस्ताव आल्यानंतर उच्च न्यायालयाने ते सादर करावे आणि शासन त्याला तत्परतेने मान्यता देईल.”
मेरी वेदर क्रीडांगणावर झालेल्या प्रमुख सभेत त्यांनी सांगितले की, गेल्या 43 वर्षांपासून चाललेल्या खंडपीठाच्या मागणीत ते स्वतः 25 वर्षे सहभागी राहिले आहेत. “न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण ही माझी कायमची भूमिका होती. माझ्या नियुक्तीनंतर ही संधी मिळाली आणि ती प्रत्यक्षात आली, याचा आनंद आहे,” असे ते म्हणाले.
कोल्हापूरकरांच्या प्रेमाने भारावून गेलो
सर्किट बेंच शुभारंभाच्या निमित्ताने कोल्हापूर भेटीत मिळालेल्या प्रेमाने ते भारावले असल्याचे भूषण गवईंनी स्पष्ट केले. शाहू महाराजांच्या कार्यभूमीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या वारशाला न्याय देण्याचे हे व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “नियतीने ही संधी दिली असून आजचा क्षण माझ्या सरन्यायाधीशपदाच्या नियुक्तीइतकाच आनंददायी आहे,” असे ते म्हणाले.
बेंचचे खरे शिल्पकार – गवई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोल्हापूर बेंच हे जवळपास 50 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर उभे राहत आहे. या निर्मितीचे खरे शिल्पकार गवई आहेत. त्यांनी केवळ मंजुरीच दिली नाही, तर उद्घाटनाची तारीख ठरवून हे स्वप्न साकार केले.” त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेंडा पार्क येथील 25 एकर जमिनीचे हस्तांतरण उच्च न्यायालयाला करण्याचे आदेश दिले तसेच कोल्हापूरला साजेशी नवी इमारत उभारण्याची हमीही दिली.
सामाजिक न्यायाचे वर्तुळ पूर्ण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
“राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची भूमिका कोल्हापूरमधून देशाला दिली. आज गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्किट बेंच स्थापन होणे हा सामाजिक न्यायाचा परिघ पूर्ण होण्याचा क्षण आहे,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला मान्यवरांची मोठी उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्य न्यायाधीश अलोक अराधे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, बार कौन्सिलचे प्रतिनिधी, राज्याचे ॲडव्होकेट जनरल डॉ. बिरेंद्र सराफ, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, ॲड. संग्राम देसाई, ॲड. अमोल सावंत, तसेच राज्यातील विविध मंत्री, खासदार, आमदार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे स्वागतपर भाषण ॲड. संग्राम देसाई यांनी केले, तर आभारप्रदर्शन कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विजयराव पाटील यांनी मानले.