Team Newsskatta
कोल्हापूर : मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त लावलेल्या साऊंड सिस्टीमवरून दुपारी झालेला किरकोळ वाद शुक्रवारी रात्री उग्र दंगलीत परिवर्तित झाला. सिद्धार्थनगर – राजेबागस्वार परिसरात दोन्ही समाजांत तणाव उसळला. दगडफेक, तोडफोड, पेट्रोल ओतून वाहने पेटविणे अशा घटनांमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या दंगलीत पोलिसांसह दहा जण जखमी झाले आहेत.
भारत तरुण मंडळ प्रणीत राजेबागस्वार फुटबॉल क्लबचा वर्धापनदिन शुक्रवारी साजरा होत होता. या कार्यक्रमासाठी दुपारी साऊंड सिस्टीम सिद्धार्थनगर येथील स्वागत कमानीजवळ लावली होती. रस्ता अडवला गेल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी ती सिस्टीम बंद केली. मात्र रात्री साडेनऊच्या सुमारास मोठा जमाव सिद्धार्थनगरात घुसला. या जमावाने वाहनांची तोडफोड केली, काही वाहने उलटवून पेटवली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला.
यावेळी सिद्धार्थनगर कमानीसमोरील निळा ध्वज फाडण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूंचा जमाव आमनेसामने आला आणि दगडफेक सुरू झाली. काही काळ परिसरात अक्षरशः धुमश्चक्री झाली. पेट्रोल भरलेल्या बाटल्याही फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचा ताबा सुटल्याने जादा पोलिस कुमक बोलावण्यात आली. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आली.
दरम्यान, सीपीआर चौक व तोरस्कर चौकातील वाहतूक बंद करून बॅरिकेडिंग करण्यात आलं. मात्र, परिसरात तणाव कायम होता. दगडफेकीत अनेक वाहने मोडीत निघाली असून 10 हून अधिक दुचाकी आणि चारचाकींची तोडफोड झाली. जखमींपैकी पाच जणांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.
या दंगलीत महिलाही आक्रमकपणे सहभागी झाल्या. पोलिसांकडे महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणताना मोठी कसरत करावी लागली. हल्ला-प्रतिहल्ल्यांमुळे परिसरात दीर्घकाळ तणावाचं वातावरण होतं.
जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी शांततेचे आवाहन केले आहे. गैरसमजातून झालेला वाद असून सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे दगडफेक करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलिस प्रमुखांनी माध्यमांशी बोलताना दिली.